जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या मुस्लिम कब्रस्तान समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आढळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवार १३ मे रोजी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पूंजू ढाके (वय-५८) रा. अयोध्या नगर, जळगाव असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र पुंजू ढाके हे शहरातील आयोध्या नगर येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रवींद्र ढाके हे त्यांची दुचाकी (एमएच १९ बीपी ९६२९) ने घरी जात होते. शहरातील नेरी नाका समोरील मुस्लिम कब्रस्तान समोर त्यांची दुचाकी दुभाजकावर आढळल्याने रविंद्र ढाके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दुचाकी चालवितांना स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मयत रवींद्र ढाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहे.