जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या ॲपेरिक्षा चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सोमवारी ॲपेरिक्षावरील अज्ञात चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील रेल्वेउड्डाण पुलावरून अनिल संजय सपकाळे रा.साकेगाव ता.जि. जळगाव आणि अमोल आनंदा सपकाळे (वय-२०, रा.दाभाडी ता.जामनेर) हे दोघे १९ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भुसावळ येथून कपडे खरेदी करून जळगाव तालुक्यातील बेळी येथे परत जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ डीजे ९९३) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले. त्यावेळी रेल्वे उड्डाण पुलावरून जात असताना समोरून येणारी अज्ञात ॲपेरिक्षाने जोरदार धडक दिली. या धडके दोघेजण डिव्हायडरवर पडले. या अपघातात अमोल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अनिल सपकाळे हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अनिल सपकाळे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार घेतल्यानंतर संजय सपकाळे यांनी सोमवारी २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात ॲपेरिक्षावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.