जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद रेल्वे लाईन परिसरात आढळेला मृतदेह हा अनैतिक संबंधातून खून असल्याचे आज भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सुनोदा येथील दीपक रघुनाथ सपकाळे ( वय-२४) असे मयताचे नाव आहे, सपकाळे यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आल्यानंतर मृतदेह नशिराबाद हद्दीतील रेल्वे परिसरात टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रविवार रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर मान व अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे पोलिसांनी ही घटना आकस्मित मृत्यू नसल्याची खात्री झाल्यानंतर खुनाची पुष्टी केली आहे. यामध्ये मयत तरुणाचा एका विवाहित तरुणीशी अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा खून झाल्याची माहिती वाघचौरे यांनी दिली. या प्रकरणांमध्ये एक विवाहित महिला व तीन तरुणांचा समावेश आहे. या चौघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे दिली.