अनिल देशमुख यांनी माझ्या नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले, सचिन वाझे यांचा गंभीर आरोप

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे.

 

वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी  एनआयएच्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. वाझे यांचं निलंबन झालं तेव्हा स्वत: देशमुख यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी परत सेवेत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप वाझेंनी केला आहे. एकूण तीन पानांचं हे पत्र आहे.

 

मी सेवेत आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूनही वसुली करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझेंनी लेटरबॉम्बमध्ये केला आहे. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपासारखेच सचिन वाझेंचेही आरोप दिसत आहेत.

 

सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता कोर्टाचे सीबीआयला आदेश आहेत. या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी एनआयए बरोबरच सीबीआयकडूनही प्रत्यक्षरित्या तपासाला सुरूवात होणार आहे. सबंधित पत्रावरून मॅजिस्ट्रेट समोर वाझेंचा जबाब ही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझेंनी घुमजाव करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Protected Content