मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ईडीनं अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून सवाल उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच, ईडीनं मुंबई आणि उरणमधील त्यांच्या मालकीच्या ४ कोटी २० लाख रुपयांच्या मालमत्तेवर देखील टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच असल्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना आता काँग्रेसकडून देखील त्याला आव्हान दिलं जात आहे.
अनिल देशमुख यांच्या मालकीची उरणमधील एक जागा ईडीनं नुकतीच जप्त केली आहे. या जागेची किंमत ईडीकडून २ कोटी ६७ लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तीच जागा ३०० कोटींची असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. “तुम्ही अजूनही माध्यमांमध्ये आलेली ३०० कोटींची किंमत खरी आहे असं सांगू शकता का? कारण उरणमधील तीच जागा २००५ मध्ये २ कोटी ६७ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती असं तुम्हीच म्हणत आहात”, असा प्रश्न सचिन सावंत यांनी केला आहे.
ईडीनं अनिल देशमुख यांच्या मालकीचा वरळीतील एक फ्लॅट देखील जप्त केला आहे. या फ्लॅटची किंमत ईडीकडून १ कोटी ५४ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. त्यावर “या फ्लॅटची रक्कम २००४ मध्येच अदा करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा आत्ताच्या प्रकरणाशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो?” अशी विचारणा सचिन सावंत यांनी केली आहे.
ईडीनं जप्तीची कारवाई झाल्यानंतर जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात अनेक बारचालकांनी अनिल देशमुखांना ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर “तुम्ही जाहीर केलं की अनेक डान्स बार चालकांनी अनिल देशमुखांना सचिन वाझेंच्या माध्यमातून ४ कोटी ७० लाख रुपये दिले. मग त्या बारचालकांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?” असं ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी विचारलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप केला होता. त्याची माहिती आपल्याला देण्यात आल्याचं देखील परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यावर “१०० कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती असून देखील त्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं?” असा देखील सवाल काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी केला आहे.