मुंबई: वृत्तसंस्था । सचिन वाझे खंडणी आरोपात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने तब्बल साडे आठ तास चौकशी केली.सीबीआयने त्यांना उलटसुलट प्रश्न विचारल्याचं सांगितलं जातं. मात्र, देशमुख यांनीकाहीही भाष्य न केल्याने देशमुख यांना नेमकं काय विचारलं गेलं? याचं गूढ वाढलं आहे.
सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले होते. सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास ही चौकशी चालली. सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती. त्यापूर्वी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरे, सिंग यांचं पत्रं आणि कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांच्या आधारे सीबीआयने ही प्रश्नावली तयार केली होती. त्यावरून देशमुख यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या. सीबीआयने अत्यंत कसून ही चौकशी केली. मात्र, या चौकशीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. देशमुख यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात आलं का? हे सुद्धा कळू शकलं नाही.
सीबीआयला तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.