लंडन वृत्तसंस्था । श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी दिवाळखोर बनले आहेत. त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठी सुध्दा पैसे नसल्याची कबुली त्यांच्या वकिलानी लंडन येथील न्यायालयात शुक्रवारी दिली आहे.
अंबानी यांनी चीनमधील तीन बँकांकडून ४ हजार ७६० कोटीचे कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. त्याची शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी अंबानी यांच्याबाजुने वकिल रॉबर्ट होवे यांनी युक्तिवाद करताना भारतातील दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील घडामोडींमुळे अंबानी हे देशोधडीला लागले असल्याचा दावा केला. होवे यांनी न्यायालयाला सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींममुळे अंबानी आता श्रीमंत राहिले नाहीत. त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय कुटुंबियांकडून अंबानी यांना मदत मिळणार नाही, असे अंबानी यांच्या वकिलाने कोर्टात स्पष्ट केले.