ममुराबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अनारोग्याचे मुळ अस्वच्छता व मानवाच्या स्वार्थी मनोवृत्तीत आहे असे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक शाशिकांत नेहेते यांनी केले. ते भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तसेच संलग्न शाखा पाचोरा, एरंडोल, रावेर आणि मराठी विज्ञान परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य प्रबोधन कार्यक्रमांतर्गत ‘स्त्रियांचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
शुक्रवार दि. ८ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी स्कूल ममुराबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे तर प्रमुख अतिथी पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक विष्णूकांत चौधरी , भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे ,मुख्याध्यापक अविनाश मोरे उपस्थित होते.
पुढील मार्गदर्शनात नेहेते यांनी मानवी आरोग्या संदर्भात संशोधन करणाऱ्या महिला शास्त्रज्ञ असिमा चटर्जी व गगनदिप कांग यांचा परिचय व जागतिक who संघटनेचे जागतिक कार्य सांगितले. ‘मुलगी वयात येतांना’ या विषयान्वये मार्गदर्शन करतांना निवृत्त प्राध्यापक दिलीप भारंबे यांनी दोष आणि आजार यातील मुलभूत फरक सांगून बाळंतपणानंतरचा चुकीचा आहार आणि कुपोषण यावर सुसंवाद साधला. चमत्काराची प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणे भारंबेनी स्पष्ट करून विद्यार्थीनींची दाद मिळवली.
अंगणवाडी सेविका व नऊ बचत गटाच्या भगिनींशी सुसंवाद साधत असतांना अंगणवाडी सेविका अनिता पाटील व मिराबाई साळुंखे यांचे शंका निरसन केले. महिला आरोग्य प्रबोधन कार्यक्रमाचे संयोजक विजय लुल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘महिलांची पारंपारिक सहनशीलता व अनाठाई दमन प्रवृत्ती व्यक्तीमत्वाला नव्हे तर कौटुंबिक आरोग्याला सुदैव घातक आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य सुखी समृद्ध कुटुंबाचा चिरंतन पाया असतो.’ अध्यक्षीय भाषणात श्री. वाघे म्हणाले कर्मकांड भूतकाळात नेतात परंतु आरोग्यविज्ञान भविष्यकाल उज्ज्वल करून दिर्घायुष्य देतो. कार्यक्रमासाठी प्रेरणा जळगाव पं.स. गटशिक्षणाधिकारी एफ. ए. पठाण व असोदा बीट विस्तार अधिकारी प्रतिमा सानप यांनी दिली. कार्यक्रमास गणेश बचत गटाच्या अध्यक्षा संगिता पाटील, ऊर्मिला शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या पुजा मिस्तरी यांसह विद्यार्थीनींच्या पालक माता बहुसंख्येने उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापक अविनाश मोरे,आरती चौधरी,ज्योती महाजन,पूनम शिंपी या शिक्षिकांनी केले. सूत्रसंचालन कल्पना चौधरी व आभार सारिका बधान यांनी मानले. यशस्वीतेसाठी पुस्तक भिशी समन्वयिका अरुणा उदावंत व सारिका पाटील (पाचोरा ), क्षमा साळी व अंजुषा विसपुते (एरंडोल ) अर्जुन सोळुंके सर व रमेश राठोड ( रावेर ) यांसह हेमलता जैसवाल,स्वाती पाटील, प्रीती चौधरी या शिक्षिकांनी परिश्रम घेतले.