मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिरमचे सीईओ अदर यांना सुरक्षा देण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अदर पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसं काय देऊ शकतं? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. यामागे काय लपलं आहे हे वास्तव समोर आलं पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले
अदर पूनावाला यांनी एका मुलाखतीत आपल्याला मुख्यमंत्र्यांपासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचे धमक्यांचे फोन येत असल्याचा खुलासा केला आहे. “अदर पूनावाला यांनी आपल्याला देशातील मोठ्या नेत्यांनी धमकावल्याचं म्हटलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते असूच शकत नाही,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“केंद्र सरकारने अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजून सुरक्षा हवी असेल तर दिली जाईल. काँग्रेसही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. पण धमकावणारे हे नेते कोण आहेत हे अदर पूनावाला यांनी जाहीर करावं,” असंही ते म्हणाले. राज्याच्या जनतेचं लसीकरण होणं ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
लसीच्या दरासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “देशात अशा स्थितीत केंद्र सरकारने सर्व जबाबदारी घ्यायला हवी होती. पण पंतप्रधानांनी राज्यांना जबाबदारी घेण्यास सांगितलं. त्यावेळी दर निश्चित करण्यात आले. पण जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही. पण मोदी है तो मुमकीन है असंच दिसत आहे”. सरकारने रेमडेसिविर खुल्या बाजारात आणलं असतं तर काळाबाजार झाला नसता असं ते म्हणाले.
“केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातील लोकांचे जीव जात आहेत. केंद्रातील सरकार सातत्याने लोकांच्या जीवाचं राजकारण करत आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.