मुंबई | अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं ‘लिफ्ट’ करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.