यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील वृक्षांची बेकायदेशीर कत्तल केली असून संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील जिल्हा परिषद मुला मुलींच्या शाळा परिसरात असलेली जिवंत ढेरेदार वृक्ष एका वखार चालकास १५ते २० हजार रुपयांमध्ये कोणतीही शासकीय परवानगी न घेता विकुन टाकली असुन या सर्व बेकाद्याशीर प्रकारात शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे तक्रार अर्जात नमुद केले. एकीकडे केंद्र आणी राज्य शासन देशात कोटयावधी रुपये खर्च करून वृक्षांची लागवड करीत असतांना दुसरीकडे अट्रावल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी आपल्या आर्थिक स्वार्थाला बळी पडून बिनापरवाना वृक्षतोड करीत असुन अशा प्रकारे शासकीय नियमांना न जुमानता वृक्षतोडीचे कृत करणाऱ्या मुख्याध्यापकावर आणी कर्मचारी यांना योग्य ती कारवाई करून सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी केली. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा रिपाईतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.