चाळीसगाव, प्रतिनिधी | औरंगाबाद-चाळीसगाव रोडवर भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाला जबर दुखापती झाल्याची घटना २७ जानेवारी रोजी घडली होती. दरम्यान तरूणावर औषधोपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील आनंदवाडी येथील जयराम चंद्रभान घोडे (वय-२५) हा तरूण २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून औरंगाबादकडून – चाळीसगावकडे येत असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात जयरामच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने पुढील औषधोपचाराकामी त्याला धुळे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २८ जानेवारी रोजी सकाळी ५:०५ वाजता जयरामची प्राणज्योत मावळली. या दुदैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धुळे येथील डॉ. सैय्यद सदाकत यांच्या खबरीवरून व कागदपत्रे प्राप्त झाल्याने पोलिसात उशिराने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना मुकेश पाटील हे करीत आहेत.