अजित पवार निर्णयावर ठाम; नविन विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडण्याच्या भूमीकेवर ठाम असल्याने पक्षाची कोंडी झाली आहे. आता विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची धुरा कोणाकडे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने लवकरच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत विरोधी पक्षनेते पदाची निवड केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत अनेक घटना घडत आहेत. पक्षातील काही मंडळी नाराज आहे, तर काही गट उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. विरोधी पक्षनेतेपदावरून पायउतार होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, मात्र राज्याशी संबंधित निर्णयांवर चर्चा राज्यातच करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार यासंदर्भात पुढील दोन दिवसात मुंबईत बैठक होणार आहे.

दोन दिवसात ठरणार विरोधी पक्ष नेता : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे. सुमारे दोन आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनापूर्वी होणाऱ्या कामकाज सल्लागार समिती बैठकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांची आवश्यकता आहे. याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे.

Protected Content