पुणे : वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील शेजारी प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.
त्यांच्या मुलाने पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन जण फरार आहे. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे व . याच लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असं या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे.
शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समिती माजी अध्यक्ष आहे. जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालक व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश आहे.
आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते असा आरोप केला जात आहे.