मुंबई प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे ७० छापे मारून मोठे घबाड जप्त केल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयकर खात्याने जाहीर केलेल्या माहितीच्या आधारे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. आयकर विभागाच्या सीबीडीटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या. ७ ऑक्टोबर रोजी हे छापे मारण्यात आले. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सीबीडीटीच्या या प्रेस रिलीजच्या आधारे अजित पवारांच्या संबंधितांचे १८४ कोटी रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे.
सोमय्या म्हणाले की, या दोन्ही समूहाकडे १८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ही बेहिशोबी संपत्ती मुंबईतील कार्यालय, दिल्लीत एका पॉश परिसरात फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रात शेत जमीन आणि साखर कारखान्यात गुंतवण्यात आली होती असे नमूद करून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.