अचानक नवरा आल्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात प्रेयसीच्या घराच्या बाल्कनीतून पडून प्रियकराचा मृत्यू

 

भंडारा : वृत्तसंस्था । विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेल्यावर अचानक पती आल्यामुळे प्रियकराची गडबड उडाली. घरातून पळ काढण्याच्या धावपळीत प्रियकराचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेत ३६ वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले.

महेश वसंत डोंगरवार हा तरुण विवाहित प्रेयसीला भेटायला गेला होता. भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी महेश मध्यरात्री गेला होता. महेश आणि संबंधित विवाहिता बेडरुममध्ये असताना अचानक दार वाजलं आणि दोघांची भंबेरी उडाली.

विवाहित प्रेयसीच्या पतीची अचानक एंट्री झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. महेश तातडीने बेडरुममधून बाल्कनीत पळाला. दरवाजा लावत खाली उतरण्याची त्याने घाई केली. या गडबडीत महेशचा पाय घसरला आणि तो थेट सिमेंटच्या रस्त्यावर पडला.

अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली थेट रस्त्यावर पडल्यामुळे महेशला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विवाहित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरुन भंडारा शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे.

Protected Content