अग्रिमा जोशुआ व सौरव घोष यांना तात्काळ अटक करा : एनएसयुआय जिल्हाध्यक्ष मराठे यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कालपासून सोशल मीडियावर स्टॅन्डअप विनोदी कलावंत अग्रीमा जोशुआ व सौरव घोष यांच्या विनोदाचे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आले. परंतु, त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी थट्टा करून महाराजांचा अपमान केल्याबद्दल जळगाव जिल्हा एनएसयुआयच्यावतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी या दोघी विकृत मनोवृत्तीच्या कलावंतांचा एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला.

गृहमंत्र्यांनी सुद्धा कारवाईचे दिले आदेश

आज सकाळी दूरध्वनीवरून जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी राज्याच्या गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्याशी सदर प्रकाराबाबत चर्चा करून या दोन्ही कलावंतांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मराठे यांनी केलेल्या मागणीनुसार गृह मंत्री ना. देशमुख यांनीसुद्धा सदर प्रकारांमधील दोषी कलावंत यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले.

विनोद करणे हा जरी पेशा असला तरी मात्र प्रत्येक पेशाचे काही तत्व असतात. राज्यामध्ये या आधी भरपूर विनोदी कलावंत कार्यरत आहेत. परंतु, कोणीही आपली पातळी सोडून महापुरुषांवरती विनोद करण्याची हिंमत केली नाही. अग्रीमा जोशुआ या महिला मनोरुग्ण कलावंताने थेट महाराजांचा अपमान केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील व देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक शिवप्रेमींना शिकवण आहे की, “पर स्री ही आपल्या मातेसमान व आपल्या भगिनी समान असते.” या प्रकारांमधील कलावंत देखील महिला आहे त्यांचा आदर राखून भावना दुखावलेल्या शिवप्रेमींनी आपला संताप गिळत शांतता राखलेली आहे. अन्यथा महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना त्यांची लायकी व त्यांची जागा शिवप्रेमींनी चांगल्या प्रकारे दाखवली असती. अशा लोकांना कायद्याद्वारे शासन होऊन कठोर कारवाई व्हावी या प्रकारची मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी गृहमंत्र्यांकडे केली

Protected Content