जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न अखेर महापौर सौ. भारतीताई सोनवणे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे.
याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी परिसरात गेल्या २२ वर्षापासून कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होत होता. अनेक वेळा तक्रारी करून देखील नागरिकांची समस्या दूर होत नव्हती. जून महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांची तक्रार स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक मनोज काळे, बंटी नेरपगारे यांनी महापौरांना कळवली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ दखल घेत अमृत योजनेच्या मक्तेदाराला सांगून मुख्य जलवाहिनीला पाणी पुरवठा जोडण्याच्या सूचना केल्या. अवघ्या महिनाभरात वारंवार पाठपुरावा करून महापौरांनी सर्व जोडण्या करून घेतल्या. रविवारी शिवकॉलनी वासियांना सुरळीत आणि योग्य वेळी पाणी पुरवठा झाला. अनेक वर्षानंतर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाल्याने ठिकठिकाणी फटाके फोडून आणि औक्षण करून महापौरांचे स्वागत करण्यात आले.
शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० मधील नागरिकांना गेल्या २० वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागत होते. या परिसरात मध्यरात्री १२ वाजेनंतर पिण्याचे पाणी सोडण्यात येत होते त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने १२ तास पाणी सोडूनही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नव्हते. अनेकांना तर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, दिपमाला काळे, माजी नगरसेवक मनोज काळे, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर यांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा अधिकारी, अमृतचे ठेकेदार, स्थानिक नगरसेवक यांना सोबत घेत थेट शिवकॉलनी परिसर गाठून योग्य त्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान, अवघ्या १५ दिवसात वारंवार पाठपुरावा करून महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण करून घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर महापौर यांनी स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, दिपमाला काळे, मनोज काळे, बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर यांच्यासह जाऊन पाहणी करून आल्या. पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही हे पाहण्यासाठी दोन वेळा चाचणी घेण्यात आली. एकदा पाईपलाईन निसटली असता ती तात्काळ जोडण्यात आली. २५ दिवस स्वतः आणि स्थानिक नगरसेवकांच्या मार्फत आढावा घेतल्यानंतर रविवारी
रविवारी दुपारपासून तीन-तीन टप्पे करून पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी स्वतः परिसरात फिरून पाहणी केली. नागरिकांशी चर्चा करून आढावा देखील घेतला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, सचिन पाटील, दिपमाला काळे, मनोज काळे, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, शिवाजी पाटील, मनपा विभाग प्रमुख नरेंद्र जावळे, ऋषिकेश शिंपी, राजू कांबळे, विजय भालेराव, राजु पाटील, व्हॉल्व्हमन व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या परिसरातील नागरिकांना असलेली पाणी समस्या दूर झाल्याने नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके फोडून महापौर सौ.भारती सोनवणे यांचे स्वागत केले. महिलांनी आमचा पाण्यासाठीचा वनवास संपल्याचे सांगत महापौरांचे आभार मानले व श्रीफळ देत औक्षण केले.