अंदमान निकोबार बेटावर मान्सून सरी

 

 

पोर्ट ब्लेअर : वृत्तसंस्था । मान्सूनचं आगमन अंदमान निकोबार बेटावर झालं आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

 

यापूर्वी केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बसल्याने ३१ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दाटतील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर ७ दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो.

 

यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं   आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण कमी मानलं जातं. सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्यपेक्षा कमी असं मानलं जातं. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज असेल, तर ते प्रमाण सामान्य मानलं जातं. हेच प्रमाण १०४ ते ११० टक्क्यांच्या मध्ये असल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक तर ११० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्यास अतिवृष्टी मानली जाते.

 

बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: अंदमान बेटांजवळच्या सागरी भागावर हा तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असून त्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. अंदाजे २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Protected Content