नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले असून आज त्यावर सुनावणी पार पडली.
पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या विद्यार्थी-पालकांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर १८ ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण केली होती. सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. कोविड-१९ पार्श्वभूमीवर विद्यापीठांमधील अंतिम सत्र परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकांवर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे. विद्यापीठांनी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्यात असे निर्देश देणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना या याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते