मुंबई : वृत्तसंस्था । गुजरात एटीएसला हवा असलेला फरार आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार, अब्दुल माजिद कुट्टी याला झारखंड येथून अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अब्दुल माजिद हा तब्बल २४ वर्षांपासू फरार होता. आता त्याला अटक करण्यात आल्याने दाऊदशी संबंधित महत्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुलं, ७५० काडतूसं आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. अन्य एका वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य या प्रकरणी अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र कुट्टी २४ वर्षांपासून फरार होता व झारखंडमध्ये दडून बसलेला होता.
एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या गुप्तचर विभागाकडून त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागला होता. यानंतर एटीएसचे पथक झारखंडला रवाना केले गेले व त्याला अटक करण्यात आली. एटीएसच्या मते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सिंडिकेटची गुजरात आणि मुंबईत अशांतता निर्माण करण्याची योजना होती आणि त्यामुळेच त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स जमवले होते.
अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींची जेव्हा चौकशी केली गेली होती. तेव्हा कुट्टीचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो फरार झाला होता. सध्या कुट्टीला कोरोना तपासणीसाठी नेण्यात येईल व नंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.