अंगात भूत असल्याच्या संशयातून काठीने मारहाण ; मायलेकाचा मृत्यू !

कल्याण (वृत्तसंस्था) अंगात भुत आहे ते भुत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल, या अंधश्रध्देपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या बेदम मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पश्चिमेकडील अटाळी गावात शनिवारी संध्याकाळी घडली. पंढरीनाथ शिवराम तरे (वय ५०) आणि चंदुबाई शिवराम तरे (वय ७६) असे मयत मायलेकाचे नाव आहे.

 

अटाळी येथील गणेशनगरमधील शिवचंद्र सदनमध्ये राहणारे पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिच्या अंगात दैवीशक्ती संचारते, या संशयातून पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगिता ही कविताला अटाळी गावात राहणा-या सुरेंद्र पाटील नामक मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेवून जात होते. त्यावेळी मांत्रिक पाटीलने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदुबाई या दोघांच्या अंगात भुत असल्याचे सांगितले. मांत्रिकाने सांगितल्याने अंधश्रध्देपोटी पंढरीनाथच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आणि पुतण्या विनायक तरे, पुतणी कविता या तिघांनी शनिवारी दुपारी पंढरीनाथ आणि त्याची वयोवृध्द आई चंदुबाई यांच्यावर तंत्रमंत्र करून तसेच त्यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मांत्रिकासह अन्य तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

Protected Content