वीज चोरी करणाऱ्या आरोपीला सक्तमजूरी व दंडाची शिक्षा

जळगाव लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एकाला वीज चोरी करणे चांगलेच महागात पडले आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वीज चोरी करणाऱ्या आरोपीला १ वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांनी मंगळवारी १६ मे रोजी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील डोंगरगाव शिवारात राहणारे पंजाबराव धनराज देशमुख यांनी पोल्ट्रीफार्म हाऊस येथे मका दळण्याच्या गिरणीवर महावितरण कंपनीची मीटर लावण्यात आली आहे या गिरणीवरील वायर कट करून त्यामधून सुमारे ४४ हजार ३७५ युनिट म्हणजेच २ लाख ९३ हजार ७२० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता अभय मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी सहाय्यक अभियंता अभय पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यामध्ये न्यायाधीश यांनी पंजाबराव धनराज देशमुख याला दोषी ठरवत भारतीय विद्युत कायदा कलम २००३चे कलम १३५ अन्वये १ वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच आरोपीने २ लाख ९३ हजार ७२० रुपये रक्कम महावितरण कंपनीला १ महिन्याच्या आत भरावी असा हुकूम देण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गोसावी यांनी सहकार्य केले.

Protected Content