वाघुर नदीपात्रात अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारातून जाणाऱ्या वाघुर धरणाच्या केटी बंधाऱ्यात बुडून एका अनोळखी तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीला आली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पेालिसांनी धाव घेत मृतदेह जिल्‍हारुग्णालया दाखल केला असून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालूक्यातील नशिराबाद शिवारात वाघूर धरणाच्या केटी बंधाऱ्यापासून शंभर ते दिडशे मिटर अंतरावर रविवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता पाण्यात तरंगतांना मृतदेह आढळून आल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळूंखे यांच्यासह पेालिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्‍हारुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचे अंदाजीत वय २५ ते ३० असून मजबुत शरीर यष्टी आहे, अंगात पांढर्या रंगाचा बनियान आणि तपकीरी रंगाची अंडरविअर असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. दरम्यान, तरूणाची ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी नशिरबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राजेंद्र साळूंखे करीत आहेत.

Protected Content