भुसावळ प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली असून ते उद्या कार्यभार सांभाळणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, येथील मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून येथे सध्या प्रभारी मुख्याधिकारी होते. करूणा डहाळे या लवकरच कर्तव्यावर रूजू होतील अशी माहिती मध्यंतरी समोर आली होती. दरम्यान, नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली असून आज याबाबतचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. ते सध्या कामठी येथे कार्यरत आहेत. ते उद्या आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ नगरपालिकेचा कारभार हा प्रभारी मुख्याधिकार्यांकडे असल्याने शहरातील अनेक कामे खोळंबली होती. विशेष करून ऐन कोरोनाच्या आपत्तीमध्ये नगरपालिकेत प्रभारीराज असल्यामुळे अडचणी येत होत्या. आता रमाकांत डाके हे कार्यभार सांभाळणार असल्याने विकासकामांना गती येईल अशी अपेक्षा आहे.