नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संकटाच्या काळात प्राण गमावलेल्या दोन कोरोना योद्धांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत केली आहे.
कोरोना योद्धा राज कुमार आणि ओमपाल सिंह यांचा समावेश आहे. यातील एक कोरोना योद्धा हा रुग्णालयात सुरक्षारक्षक होता तर एक जण शाळेचे मुख्याध्यापक होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे
“आमच्या कोरोना योद्धांनी जिवावर उदार होत लोकांची सेवा केली आहे. सुरक्षारक्षक राज कुमार आणि शाळेचे मुख्याध्यापक ओमपाल यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं होतं. आज दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेतली. त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा धनादेश सोपवला. भविष्यातही या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहू”, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
राज कुमार हे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर इथं सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर ओमपाल सिंह हे कल्याणपुरी इथे बॉईज सिनियर सेकंडरी शाळेत मुख्याध्यापक होते.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताला पाहायला मिळत आहे. विदर्भासह मुंबई आणि मराठवाड्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्बंध लावायला आता सुरुवात झाली आहे.