पैशांसाठी विवाहितेला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मोहाडी येथी माहेर असलेल्या विवाहितेला नोकरी लावण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत मारहाण करून छळ केला. तर पैसे आणले नाही म्हणून विळ्याने खून करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ७ मे रोजी सकाळी ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या सोनाली संतोष म्हस्की यांचा विवाह जामनेर तालुक्यातील किन्ही गावातील संतोष भास्कर म्हस्की यांच्यासोबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेला आहे. लग्नाच्या सात महिन्यानंतर पती संतोष याने नोकरी लावण्यासाठी विवाहितेला माहेरहून ५ लाखांची मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सासू, दिर आणि नणंद यांनी देखील पैशासाठी छळ केला. तसेच पती संतोष हा दारूच्या नशेत येवून पैशांसाठी विळा किंवा कुऱ्हाडीने मारून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी ७ मे रोजी सकाळी ८ वाजता विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती संतोष भास्कर म्हस्की, सासू कासाबाई भास्कर म्हस्की, सासरे प्रमोद भास्कर म्हस्की तिघे राहणार किन्ही ता. जामनेर आणि नणंद मनिषा अरूण गवळी रा. बुलढाणा यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण शिंपी करीत आहे.

Protected Content