कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी विद्यापीठाने मागविले प्रस्ताव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यावर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्‍या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून त्यासाठी २७ मेपर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत.

 

गतवर्षापासून विद्यापीठाने कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार सुरु केला असून ५१०००/- रूपये स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिला पुरस्कार गतवर्षी सामाजिक क्षेत्रासाठी जाहीर झाला होता आणि तो कोकणच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील “भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान” या संस्थेला देण्यात आला होता. यावर्षाचा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी दिला जाणार आहे. कृषी उत्पादन, विस्तार, कृषी प्रक्रिया, पीक फेरबदल, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर, नाविण्यपूर्ण उपक्रमांचा समाजाला झालेला उपयोग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य, फलोत्पादन, वनौषधी व सेंद्रीय पध्दती या कृषी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांना यावर्षाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारासाठीचे व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातील असावी. व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे वय ४० वर्षापेक्षा कमी नसावे आणि १५ वर्षापेक्षा जास्त काळ त्या क्षेत्रात काम केलेले असावे. संस्था असेल तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्या संस्थेचे कार्य देखील त्या क्षेत्रात १५ वर्षाहून अधिक असावे. या राज्यपातळीवरील पुरस्कारासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागवले असून विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील अर्ज, पात्रता, नियमावली या विषयीची माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञ निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर पुरस्कार जाहीर केले जातील. विशेष परिस्थितीत पुरस्कारसाठी प्राप्त प्रस्तावाव्यतिरिक्त इतर योग्य आणि प्राप्त व्यक्ती अथवा संस्थेच्या नामाकंनाचा देखील विचार केला जावू शकतो. पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याची अंतिम मुदत शनिवार दि. २७ मे २०२३ अशी आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

Protected Content