अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणाच्या त्रासाला कंटाळून जामनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

गोकुळ सुनिल पारधी असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिचे गोकुळ पारधी यांच्या सोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, पिडीत मुलीचे लग्न दुसऱ्या तरूणासोबत जुळले होते. परंतू पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिचे १८ वर्ष वय पुर्ण झाल्यावर तिचे लग्न होणार होते. पण गावातील गोकुळे पारधी याने पिडीत मुलीला फोन करून “तुझे लग्न मोडून टाक नाही तर तुझ्या पतीला भेटून सांगेल की, तुझे माझ्यासोबत प्रेम संबंध आहेत. तू तिचे सोबत लग्न करून नकोस “. तसेच संशयिताने तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी केली. दरम्यान आपल्या आईवडीलांची बदनामी होईल या भितीने तरूणीने राहत्या घरात १२ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर मयत मुलीच्या वडीलांना जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोकुळे सुनिल परधी याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.

Protected Content