चोपडा प्रतिनिधी । येथील गुजराथी गल्लीतील स्थित १२५ वर्ष जुने व्दारकाधीश मंदिरातील हवेलीत श्रावण मासानिमित्त महिनाभर झुला महोत्सव साजरा केला जातो. या झुला महोत्सवात रोज नवनवीन देखावे सजवले जात असून हे देखावे पाहण्यासाठी वैष्णवपंथी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
सविस्तर माहिती अशी की, येथील जवळपास १२५ वर्ष जुने व्दारकाधीश मंदिर (हवेली) असून येथे वर्षभरात अनेक कार्यक्रम होत असतात. ठाकुरजीची मूर्ती (श्रीकृष्णाचे अवतार) असून दर वर्षी श्रीकृष्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. तसेच श्रावण मासात संपुर्ण महिनाभर ‘झुला महोत्सव’ असतो. यात वैष्णवपंथीच्या महिला रोज नवनविन सजावट करत असतात. ही सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सजावट करत असतांना कुठेही चिपकवण्यासाठी कोणतेही साधन वापरले नसून ही सजावट फक्त एक बारीक दोराने बांधण्याचे काम करून केली जाते. ही कला कृतीचे काम ठराविक महिलाच अवघ्या दोन ते तीन तासातच करून घेतात. हा झुला महोत्सवात कधी केळीचे पिन काडून तर केळीचे कच्ची कळ्या कधी फळफ्रूट, ड्रायफ्रूट, भाजीपाला, आणि शेवटच्या दिवशी काचेच्या तुकड्यापासून ही सजावट केली जाते. ही सजावट इतकी अप्रतिम असते की, एखाद्या कलाकारांने काम केले असावे, असे त्या सजावटीत काम दिसत असते. नक्षीदार, कोरीव, कलरिंग, आणि मांडणी अश्या विविध अंगांनी हा देखावा सजविला जात असतो. ही सजावट दुपार पासून सुरुवात केली तरी संध्याकाळ पर्यंत पूर्ण होऊन संध्या.दर्शनासाठी खुले करण्यात येते.
यावेळी वैष्णवपंथीसह परिसरातील अनेक जाती धर्माचे भाविक येत असतात. ही कलाकृती पाहून मन प्रसन्न होत असते. आणि कशी केली असेल ? हा विचार करत मंदिरात भाविक बसूनच राहतात. ही सजावट करण्यासाठी आश्वनी गुजराथी, सोनल गुजराथी, तेजु गुजराथी, सेजल गुजराथी, शैला गुजराथी, अर्चना गुजराथी यांच्यासह अनेक महिला अथक परिश्रम करत असतात.