जळगाव प्रतिनिधी । जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापुरकर यांच्यावर औषध खरेदीच्या टेंडरमध्ये घोळ, प्रतीनियुक्तीचे आदेश नसतांना प्रतिनियुक्ती करणे यासह कामात अनियमितेचा ठपका ठेवून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे असा ठराव करण्यात आला आहे. सोमवारी १७ रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा ठराव करण्यात आला.
श्वान दंशावर उपचारासाठी आवश्यक लस खरेदी कमी प्रमाणात करण्यात आल्याच्या मुद्दा जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित केला. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियमानुसार औषध खरेदी न करता टेंडर प्रक्रीयेमध्ये घोळ केल्याचा तसेच एनआरएचएम कर्मचाऱ्यांची प्रतीनियुक्तीचे अधिकार नसतांना प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केला. यावरून वादंग निर्माण झाला, अखेर सर्व सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापुरकर यांना कार्यमुक्त करण्यात येऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली, त्यानंतर त्यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, महिला बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य
कार्यकारी अधिकारी डी.एस.अकलाडे आदी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील ३३ विषयांना मंजुरी देण्यात आली.
चहार्डी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावरून वाद
जि.प.सदस्या डॉ.निलिमा पाटील यांच्या जि.प.गटामधील चहार्डी या गावात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र इमारतीच्या उद्घाटनावर उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी आक्षेप घेतला. उद्घाटनाबाबत जि.प. आणि पं.स.च्या एकाही पदाधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली नाही तसेच निमंत्रण देण्यात आले नाही, यावरून नाराजी व्यक्त करत या इमारतीचे कामकाज थांबविण्यात यावे अशी मागणी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले. चहार्डी आरोग्य केंद्रासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मोहाडी व वाघळूद ग्रामसेवकांवर कारवाई धरणगाव तालुक्यातील वाघळूद खुर्द आणि जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे २५:१५ अतर्गत व्यायामशाळा तसेच रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारीला निधी मंजूर झाला आहे, मात्र दोन्ही गावाच्या ग्रामसेवकांकडून ६ महिन्यांपासून कामाबाबत ठराव देण्यात येत नसल्याने कामाला विलंब होत असल्याची तक्रार करत दोन्ही ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जि.प.सदस्य प्रताप पाटील, पवन सोनवणे यांनी केली. यावरून सीईओ यांनी जळगाव आणि धरणगाव बीडीओ यांना दोन्ही ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
शापोआ ठेकेदारावर कारवाई नाही
शालेय पोषण आहार प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करण्यात आल्याची तक्रार दोन वर्षापूर्वी जि.प.सदस्य जयपाल बोदडे आणि पल्लवी सावकारे यांनी केली होती, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती, मात्र समितीचा अहवाल आल्यानंतरही संबंधित ठेकेदारांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न बोदडे आणि सौ.सावकारे यांनी उपस्थित केला. यावरून सीईओ यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली असून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.