चोपडा, प्रतिनिधी | राज्यभरात एकीकडे खाजगी शाळांचे वर्ग वाढत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्याचे चित्र सर्वत्र दिसत असतांना मात्र चोपडा तालुक्यातील आदिवासी बीट मध्ये मात्र दिवाळीच्या सुट्टीतही विद्यार्थी अध्ययन करतांंना दिसत आहेत.
दिवाळीच्या फराळासोबतच विद्यार्थ्यांमधील अध्ययनाची गोडी वाढावी म्हणून आदिवासी बीट मधील अनेक शाळांमध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. चोपडा पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, गजरे व उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांच्या प्रेरणेतून तसेच केंद्रप्रमुख वंदना बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वराड, नागलवाडी, वैजापूर इत्यादी भागातील शाळांमध्ये सुट्ट्या सुरू असूनही मुख्याध्यापक, शिक्षक शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करत असल्याचे चित्र दिसत आहे. या कृतीयुक्त अध्ययनातून विद्यार्थीसुद्धा मोठ्या आवडीने शिकत आहेत. सुटीत अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. उच् अध्ययनस्तर विकसन कार्यक्रम अंतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील प्रारंभिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करताना कृतीसह वैयक्तिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना अंक ओळख व अक्षर ओळख करून सराव करून घेण्यात येत आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना चोपडा आदिवासी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र जी अहिरे यांची असून त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनानाने सुट्टीतही विद्यार्थ्यांकडून कृतीसह अध्ययन करून घेतल्यानं शिक्षक व विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र आहिरे, केंद्रप्रमुख वंदना बाविस्कर, वराड शाळेचे मुख्याध्यापक विवेक पाटील, नागलवाडी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, वैजापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भादले, उपशिक्षक विशाल पाटील आदी मेहनत घेत आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर या उपक्रमाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र आहिरे यांनी सांगितले की, या शाळांच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चित करताना या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतिरिक्त वेळेत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे याची जाणीव झाली.आदिवासी बीट मधील शिक्षक हे तरुण,प्रामाणिक व कार्यक्षम असल्याने त्यांची सहविचार सभा घेऊन प्रेरित केले.महाराष्ट्रातील जरेवाडी शाळा ३६५ दिवस सुरू असते. आपणही या सुटित शाळा भरवली तर निश्र्चितच चांगला उपक्रम राबवला जाईल. या उद्दैशाने हा उपक्रम राबवावा असे वाटले व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी प्रतिसाद दिला.