जळगाव, प्रतिनिधी | शहरातील युवाशक्ती फौंडेशनतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या भारतीय सैन्य दलाविषयीच्या देखाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आजपर्यंत सुमारे १७५० तरुणांसह ५००० नागरिकांनी देखावा पाहिला आहे.
युवाशक्ती फाउंडेशनचे यंदा ११ वे वर्ष आहे. फौंडेशनतर्फे या वर्षी भारतीय सैन्य दलाच्याविषयी देखावा साकार करण्यात आला आहे. यात थलसेना, वायुसेना, नौसेना यांचे कार्य, त्यांचा इतिहास, त्यांचे शौर्य याविषयी नागरिकांना एलसीडी प्रोजेक्टरने दृकश्राव्य माहिती दिली जात आहे. तसेच पोस्टर व फलकाद्वारे सैन्य दलामध्ये अधिकारी, सैनिक या पदांवर जाण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा, चाचणी आदींची माहिती युवकांना मिळत आहे. या क्षेत्रात तरुणांनी प्रवेश करून देशसेवा करावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे. बारावी शिक्षण पूर्ण झाल्यानतर सुरक्षा दलात करिअर करण्यासाठी मुलाखत, परीक्षा आदि आवश्यक त्या प्रक्रिया केल्यावर देशसेवेची संधी मिळत असते. या विषयावर फौंडेशनचे कार्यकर्ते युवकांसह नागरिकांना माहिती देत असून शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देत देखाव्याचे कौतुक केले आहे. यासाठी संस्थापक विराज कावडिया, अमित जगताप यांचेसह उत्सव अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, सचिव पवन माळी, मनजित जांगीड,तेजस दुसाने, दीक्षांत जाधव, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, शिवम महाजन, विनोद सैनी, भवानी अग्रवाल, सौरभ कुलकर्णी, आकाश धनगर यांचेसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.