मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी सातत्याने नवे निर्णय घेत असतात. गुगलने अलीकडेच आपल्या प्ले स्टोअरवरून 180 हून अधिक अॅप्स हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्युबने देखील मोठी कारवाई केली आहे. युट्युबने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून तब्बल 29 लाख व्हिडिओ हटवले असून 48 लाख चॅनेल्स बंद केले आहेत.
युट्युबने एक अधिकृत अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख आहे. युट्युबच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे 29 लाख व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. याशिवाय, 48 लाख चॅनेल्स बंद करण्यात आली आहेत, कारण ते नियमांचे उल्लंघन करत होते.युट्युबच्या अहवालानुसार, ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य हटवलेले व्हिडिओ भारतीय क्रिएटर्सकडून अपलोड करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांपासून युट्युब भारतात मोठ्या प्रमाणात व्हिडिओ हटवत आहे. 2020 पासून भारतात सर्वाधिक व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत. भारतानंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मागील तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी जास्त व्हिडिओ हटवण्यात आले. युट्युब ने स्पष्ट केले आहे की, त्यांची ऑटोमॅटेड कंटेंट मॉडरेशन प्रणाली नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ ओळखते. या तंत्रज्ञानाने 99.7 टक्के व्हिडिओ फ्लॅग केले आणि त्यानंतर कंपनीने त्यावर कारवाई केली. हटवलेल्या 30 लाखांहून अधिक व्हिडिओंमध्ये प्रामुख्याने द्वेषपूर्ण भाषण, अफवा, छळ आणि दिशाभूल करणारा कंटेंट होता. हे सर्व व्हिडिओ युट्युब च्या धोरणांचे उल्लंघन करत होते. यामुळेच कंपनीला कठोर पावले उचलावी लागली.
युट्युबने 48 लाखांहून अधिक चॅनेल्स हटवले असून त्यांची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
बनावट व्हिडिओ अपलोड करणे
कॉपीराइट उल्लंघन
द्वेषयुक्त आणि अश्लील कंटेंट
जाहिरात धोरणांचे उल्लंघन
भारतासह, जगभरातील इतर देशांमध्येही युट्युबने मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ हटवले आहेत. त्यामध्ये:81.7% व्हिडिओ स्कॅम, स्पॅम किंवा दिशाभूल करणारे होते.6.6% व्हिडिओ छळासंदर्भातील होते.5.9% व्हिडिओ मुलांच्या सुरक्षेचा भंग करत होते. 3.7% व्हिडिओ हिंसाचाराशी संबंधित होते. याशिवाय, युट्युबने 130 कोटीहून अधिक कमेंट्स देखील डिलीट केल्या आहेत, कारण त्या धोरणांचे उल्लंघन करत होत्या. या कठोर कारवाईमुळे युट्युब वरील अनुपयुक्त कंटेंटवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. तसेच, विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कंपनी भविष्यात अजून कठोर धोरणे लागू करू शकते.