पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्नीची प्रकृती बिघडल्याने जामनेरातील रूग्णालयात तपासणी करून घरी निघालेल्या तरूणाचा डंपरच्या खाली आल्याने मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, संदिप राजेंद्र सुर्यवंशी (मराठे) वय – ३३ हा तरुण आई व पत्नीसह खडकी ता. चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. संदिप हा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास संदिप हा गायत्री हिच्या सोबत खडकी ता. चाळीसगाव येथुन मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. क्यु. १८५९ ने जामनेर येथे जाण्यासाठी निघाला. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून पाचोर्याच्या दिशेने येत असतांनाच सांगवी ता. पाचोरा गावानजीक बस स्थानकाजवळ संदिप याची मोटरसायकल गतिरोधक वर आदळल्याने मोटरसायकलचे नियंत्रण सुटले व मोटरसायकल घसरली.
यावेळी पत्नी गायत्री ही विरुध्द बाजुला पडली मात्र संदिप हा रोडावर पडल्याने त्याचवेळी कुर्हाडच्या दिशेने धरधाव वेगात जाणार्या एम. एच. ४६ – एफ. ७८२४ या क्रमांकाच्या डंपरच्या मागील चाकाखाली सापडुन संदिप याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रुग्णवाहिका चालक दादु पाटील यांच्या मदतीने संदिप याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पोलिसांनी डम्पर ताब्यात घेतले असून घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.