जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काव्यित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘युवा SPARK-2025’ या विद्यापीठस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या केसीआयआयएल (KCIIL) इन्क्युबेशन सेंटरच्या पुढाकाराने युवारंग २०२५ अंतर्गत ही स्पर्धा प्रथमच आयोजित केली जात आहे.
या प्रसंगी KCIIL संचालक मंडळ सदस्य डॉ. राजेश जावळेकर, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. अरुण इंगळे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील तसेच कार्यक्रम समन्वयक रोशनी जैन उपस्थित होते. ‘युवा SPARK-2025’ ही स्पर्धा केवळ विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा गौरव करण्यापुरती मर्यादित नसून, त्यांना उद्योजकतेकडे वळविण्याचा एक प्रयत्न आहे. ही स्पर्धा स्टार्टअप संस्कृतीला चालना देणारी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना शेती, ग्रामीण विकास, नवतंत्रज्ञान व ओपन इनोव्हेशन या चार प्रमुख क्षेत्रांत त्यांच्या कल्पना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. यातून निवड होणाऱ्या सर्वोत्कृष्ट दहा कल्पनांचे युवारंग २०२५ मध्ये सादरीकरण होईल आणि त्यामधून तीन सर्वोत्कृष्ट कल्पनांना बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दहा निवडक कल्पनांना KCIIL इन्क्युबेशन सेंटरमार्फत एक वर्षासाठी मोफत इनक्युबेशन सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, जे त्यांच्या कल्पनांना स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यास मोलाचे ठरणार आहे.
या स्पर्धेची प्रक्रिया २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कल्पना नोंदणीसह सुरू झाली असून, त्यानंतर नामांकित ज्युरी मंडळाकडून मूल्यांकन केले जाईल. यानंतर निवडलेल्या कल्पक विद्यार्थ्यांना युवारंगच्या मंचावर आपले प्रकल्प सादर करता येतील. या उपक्रमातून केवळ स्पर्धा नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेच्या दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि आपले कल्पक विचार सादर करून विद्यापीठाच्या स्टार्टअप आणि इनोव्हेशन इकोसिस्टमला बळकट करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही स्पर्धा नवकल्पनांची दिशा ठरू शकते आणि भविष्यातील यशस्वी स्टार्टअप्सची पायाभरणीही यामधून होऊ शकते.
या स्पर्धेत सहभागासाठी व अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://kciil-kbcnmu.in भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



