अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील सुधाकर चौधरी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून ते गेल्या १३ वर्षापासून माळी समाजातील गरजू लोकांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करीत आहेत. या सगळ्या सोहळ्याचा खर्च ते करीत असतात. यावर्षीही त्यांनी मोठा लग्नसोहळा आयोजित करून समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत तो सोहळा पार पाडला.
समाजाचे समाजमंदिर असले पाहिजे, त्यासाठी समाजातील व राजकीय लोकांचे सहकार्य घेऊन त्यांनी ते ही पुर्ण केले आहे. महात्मा फुले यांच्या नावाने ट्रस्ट तयार करून गेल्या १४ वर्षांपासून समाजसेवेचे काम करीत आहेत.परीसरात दुःख असो सुख असो, लग्न असो वा उत्तर कार्य असो किंवा तत्सम काही असो, आपले व्यक्तिगत कामे सोडून सुधाकर चौधरी सुरतमध्ये समाजकार्यात हजेरी लावतात.
एक आदर्श व्यक्तिमत्व संयमी संवेदनशील मनाचे हळवे समाजाविषयी नेहमी कळकळ असलेले सुधाकर चौधरी कामानिमित्त सुरतला गेले आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर तेथे चांगला जम बसवला. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ते गेल्या १३ वर्षापासून वधु-वर परिचय मेळावा व लग्न सोहळा विनामूल्य करीत असल्याने तालुक्यात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. सुधाकर चौधरी यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने समाजसेवा करायला मिळत असल्याचे समाधान आहे, असे म्हटले आहे. भविष्यातही समाजाचे आणखी मोथ-मोठी कामे करून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक चळवळ उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.