Home Cities जळगाव तरुणांनी चिकित्सक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज –  प्रा. शरद बाविस्कर 

तरुणांनी चिकित्सक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज –  प्रा. शरद बाविस्कर 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बदलत्या जागतिक परिस्थितीत तरुणाईसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सखोल ऊहापोह करत लेखक व तत्त्वज्ञान अभ्यासक प्रा. शरद बाविस्कर यांनी जळगाव येथे प्रभावी व्याख्यान दिले. प्रा. शेखर सोनाळकर बौद्धिक व्यासपीठ, जळगाव तर्फे आयोजित या कार्यक्रमात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2026 च्या विजेत्यांचा गौरवही करण्यात आला.

प्रा. शेखर सोनाळकर बौद्धिक व्यासपीठाच्या वतीने “बदलता जागतिक अवकाश व तरुणाईपुढील आव्हाने” या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत प्रा. शरद बाविस्कर यांनी सध्याच्या जागतिक राजकीय, सामाजिक व आर्थिक बदलांचा तरुणांच्या विचारविश्वावर होणारा परिणाम स्पष्ट केला. त्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, जागतिकीकरण आणि मूल्यव्यवस्थेतील बदल यांच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी चिकित्सक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या अवकाशात स्वतःची ओळख जपत सामाजिक बांधिलकी जोपासणे हे आजच्या पिढीसमोरील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणात त्यांनी जागतिक पातळीवरील संघर्ष, पर्यावरणीय संकटे, डिजिटल माध्यमांचा प्रभाव आणि रोजगाराच्या बदलत्या संधी यांचा वेध घेतला. तरुणांनी केवळ करिअरकेंद्री विचार न करता सामाजिक भान जपले पाहिजे, असे सांगत त्यांनी विचारमंथनात्मक भूमिका मांडली. संवाद, विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या आधारेच तरुणाई सक्षम होऊ शकते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2026 च्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. तरुणांमध्ये विचारप्रवृत्त वातावरण निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा व व्याख्यानमालेचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

व्यासपीठावर वासंती दिघे, प्रा. सत्यजित साळवे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू के. बी. पाटील, प्रा. राजू पवार, खलील देशमुख, प्रा. यशवंत सैंदाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्मिता भालेराव यांनी केले. व्याख्यानाला नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


Protected Content

Play sound