जळगाव (प्रतिनिधी) भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने २२ वर्षीय तरुणाला चिरडल्या घटना आज सकाळी अजिंठा चौफलीजवळ घडली. या अपघातात तरुण जागीच ठार झालाय. दरम्यान, यावेळी संतप्त नागरिकांनी रास्तारोको केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात अधिक असे की, सालार नगरात राहणारा गुफरान अजमल खान (वय २२) हा युवक हिरोहोंडाच्या शोरूमवर काम करतो. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तो नेहमी प्रमाणे कामावर जाण्यास घरून निघाला. हॉटेल मानसी जवळून रस्ता क्रॉस करत असतांना अचानक भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्र.(ओ.डी.०२ ए.एल. ४८२६) ने गुफरानला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी व गुफरानच्या नातेवाईकांनी दोषी महामार्ग अधिकारी तसेच कंटेनर चालकावर कारवाई करण्यासाठी रास्तारोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. काही वेळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.