मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे ट्रक मागे घेताना एका दुचाकीस्वाराला धडक लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार, २१ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडसगाव येथील पुलाजवळ एम.पी. ०९ एचएच १२८६ या क्रमांकाचा ट्रक अचानक मागे घेण्यात येत होता. ट्रक चालकाने कोणत्याही व्यक्तीला मागे उभे न करता बेजबाबदारपणे ट्रक मागे घेतला. त्याच वेळी मागे दुचाकीवर बसलेला दिवाकर सिताराम कोळी (वय २२, रा. मेळसांगवे, ता. मुक्ताईनगर) याला ट्रकची जोरदार धडक बसली.

या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, दिवाकर कोळी गंभीर जखमी झाला आहे. अपघात होताच ट्रकचालक आपले वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. जखमी दिवाकर कोळीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिवाकर कोळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पवार करत आहेत.



