पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टेहू शिवारातील पुलाजवळ दोन दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम संभाजी पाटील वय-२८, रा. टेहू ता. पारोळा असे मयत झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता श्याम संभाजी पाटील हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १९ एझेड ३७७६) ने श्याम पाटील हा तरूण गावातील समाधान कैलास अहिरे याच्या सोबत पारोळा ते कजगाव रोडवरून जात असताना टेहू शिवारातील वाकड्या पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक एमएच २० सीएल ४६४० ने जोरदार धडक दिली. या धडकेत श्याम संभाजी पाटील याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला समाधान कैलास अहिरे हा जखमी झाला. दरम्यान याप्रकरणी महेश श्याम पाटील यांचे काका संजय राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील चालक विनोद विठ्ठल महाले यांच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार इक्बाल शेख करीत आहे.