पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील विचखेडा ते करंजी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात एका 31 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयताची ओळख राहुल सुनिल चौधरी (रा. पाण्याची टाकी जवळ, पारोळा) अशी झाली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक बापू चौधरी (रा. आझाद चौक, पारोळा) यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपक चौधरी हे त्यांच्या कुटुंबासह राहून शेती व्यवसाय करतात. त्यांचा चुलत भाऊ राहुल चौधरी आपल्या आईसह पाण्याची टाकी परिसरात राहत होता. दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारास 10 वाजता दिपक चौधरी यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरून माहिती दिली की, त्यांचा चुलत भाऊ राहुल यास जखमी अवस्थेत कुटीर रुग्णालय, पारोळा येथे दाखल केले आहे.

त्यानंतर दिपक चौधरी, भैय्या नामदेव चौधरी व रविंद्र गणपत चौधरी हे तातडीने रुग्णालयात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राहुलला तपासून मृत घोषित केले. राहुलच्या नाकाला गंभीर मार लागला होता आणि रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. चौकशीत समोर आले की, विचखेडा ते करंजी या मार्गावरील हायवेवर तो जखमी अवस्थेत मोटारसायकलजवळ पडलेला आढळला होता. नागरिकांनी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात आणले होते.
यानंतर नातेवाईक व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, फोर-वेच्या मध्यभागी डिव्हायडरमध्ये डिस्कव्हर मोटारसायकल (एम.एच.19 ए.डब्ल्यू. 5822) उभी होती. तिची पेट्रोल टाकी आणि सीट कव्हर तुटून जवळच पडलेली होती. मागील नंबर प्लेटही रस्त्यावर आढळली. या सर्व परिस्थितीत हा अपघात कसा घडला याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सुनिल हटकर यांच्या कडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.



