पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात धावण्याची चाचणी देताना आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान ही घटना घडली. मैदानी चाचणीत धावताना एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके असे या तरुणाचे नाव आहे.दरम्यान पाचदिवसांपूर्वीच नवी मुंबईतही पोलीस भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. त्यातील एकाचे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना निधन झाले होते.
पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर पोलीस भरती सुरू आहे. पुणे शहर पोलीस भरती दरम्यान धावताना तुषारला चक्कर आली होती. घटनेनंतर त्याला ससूनच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार आज (शनिवार) सकाळी ८ वाजता तुषारने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना अचानक तो जागीच कोसळला. तेथील अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला रुग्णवाहिकेतून ससूनला नेलं. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. नवी मुंबईत पोलीस भरती दरम्यान पाच दिवसापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाला आहे,तर चौघांना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवी मुंबईतील एसआरपीएफ कॅम्पमध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यानही घटना घडली. प्रेम ठाकरे आणि अक्षय बिराडे अशी मृत तरुणांची नावे आहेत. प्रेम ठाकरे याचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.