जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून पडल्याने बिहार येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव-भादली रेल्वेलाईन दरम्यान घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, महेशकुमार चनरमा माथुर (वय-२०, रा़ पिंडारी, जि़छपरा, बिहार) असे मयत तरूणाचे नाव आहे. महेशकुमार माथुर हा रेल्वेतून प्रवास करित असताना अचानक जळगाव व भादली दरम्यानात रेल्वेतून पडला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तालुका पोलिसांना यााबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शैलेश चव्हाण, सुधाकर शिंदे, विलास शिंदे, धर्मेंद्र ठाकूर आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात हलविले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.