पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावात शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुर्दैवी घटना घडली. राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर सुतारकाम करत असताना अचानक पाय घसरल्याने धनराज सुभाष सुतार (वय ३५) हा युवक खाली पडला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यूमुखी पडला. ही घटना नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धनराज सुतार हा वरखेडी परिसरातील एक नावाजलेला सुतार कारागीर होता. आपल्या कुशल कामामुळे तो पंचक्रोशीत ओळखला जायचा. त्या दिवशी तो घराच्या तिसऱ्या मजल्यावर काही दुरुस्तीसाठी सुतारकाम करत होता. दुपारी सुमारे एकच्या सुमारास अचानक पाय घसरल्याने तो थेट जमिनीवर पडला. डोक्याला जबर इजा झाल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती.

या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. विशेषतः नवरात्रोत्सवातच ही घटना घडल्याने वातावरण अधिकच गढूळले. मृत धनराज सुतार याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन अल्पवयीन मुली आणि दोन थोरले भाऊ असा मोठा परिवार असून, तो घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धनराजचा नम्र स्वभाव आणि मेहनती वृत्तीमुळे गावात त्याचे मोठे सामाजिक वर्तुळ होते.



