
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बोळे गावातील २० वर्षीय तरुणाचा ढोली शिवारातील निमदाळी धरणातील पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनल रवींद्र पाटील (वय २०, रा. बोळे, ता. पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सोनल पाटील हा तरुण आपल्या कुटुंबासह बोळे गावात राहत होता. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील ढोली शिवारातील निमदाळी धरणाच्या पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच, गावातील आनंद भिल आणि भोला कोळी कोडी या तरुणांनी तातडीने धरणातील पाण्यात उतरून सोनल पाटील याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याला तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सोनलला मृत घोषित केले.
या घटनेने बोळे गावावर शोककळा पसरली असून, सोनलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.



