एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चौघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या शिवीगाळीचा जाब विचारल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तक्रारदाराला लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकिल खान हमिद खान (वय ३८, रा. इस्लामपुरा, चुनाभट्टी, एरंडोल) हे हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अकिल खान यांचा भाचा शाहरुख शेख याला संशयित आरोपी शाहरुख शेख याने फोनवरून विनाकारण शिवीगाळ केली होती. या शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी अकिल खान गेले असता, एरंडोल शहरातील चुनाभट्टी जवळील मजीद मोमीन यांच्या भंगाराच्या दुकानासमोर आरोपींनी त्यांना गाठले.

बाचाबाचीचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी अकिल खान यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्यांनी अकिल खान यांच्या हातावर, पाठीवर आणि छातीवर गंभीर दुखापत केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी (दमबाजी) देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर अकिल खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिसात संशयित आरोपी चुन्ना शेख अन्वर , अरबाज युनिस बेलदार , बाबा शब्बीर मलिक आणि गोलू रईस शेख ( सर्व राहणार एरंडोल) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी माणिक पाटील हे करीत आहे.



