Home क्राईम लग्नासाठी तगादा लावत तरुणीचा विनयभंग ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नासाठी तगादा लावत तरुणीचा विनयभंग ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारंवार लग्नासाठी तगादा लावणे, पाठलाग करणे आणि लग्नास नकार दिल्यास लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित तरुणाविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुली परिसरात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवारी ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पिडीत तरूणी ही तांबापूरा परिसरातून जात असतांना संशयित आरोपी सलमान सगीर काकर (रा. पंचशील नगर, जळगाव) हा पीडित तरुणीचा पाठलाग केला आणि तिला वाटेत थांबवले.

संशयित आरोपीने पीडितेच्या खांद्यावर हात ठेवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. “माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर,” असे म्हणत त्याने पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पीडितेने याला विरोध केला असता, आरोपीने तिला गंभीर धमकी दिली. “मी तुझे लग्न दुसरीकडे होऊ देणार नाही. जर तू दुसरीकडे लग्न केले, तर तुला आणि तुझ्या लहान भावाला मी जीवे मारून टाकीन,” अशा शब्दांत त्याने पीडितेचा छळ केला. भेदरलेल्या अवस्थेत पिडीत तरूणीने थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वंजारी करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound