Home क्राईम तरूणाचे बंद घर फोडले ; लाखो रुपयांचे दागिने लंपास

तरूणाचे बंद घर फोडले ; लाखो रुपयांचे दागिने लंपास


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात पुन्हा एकदा बंद घरे फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवेंद्र नगरात चोरट्यांनी एका तरुणाचे बंद घर फोडून ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुण बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला. या घटनेमुळे रामानंदनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मनीष कुमार सिंग (वय ३७, रा. देवेंद्र नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बाहेरगावी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे घरातील कपाटे आणि तिजोरी उघडून त्यातील सोन्याचे आणि चांदीचे मौल्यवान दागिने लंपास केले. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मनीष कुमार सिंग परत आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आणि घरातील ऐवज अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

या चोरीमध्ये चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच मनीष कुमार सिंग यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, सोमवारी (८ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा (भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहेत.


Protected Content

Play sound