जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेशवाडी येथील स्वप्निल धर्मराज ठाकूर (वय 17) यास जुन्या भांडणातून तुकारामवाडी येथील चौघांनी चॉपरने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे.
आकाश रविंद्र मराठे वय 21 रा. हनुमान मंदिराजवळ तुकारामवाडी असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथील रहिवासी स्वप्निल ठाकूर हा तरुण 31 डिसेंबर रोजी त्याच्या घरासमोर उभा होता. यावेळी भूषण विजय माळी व पवन बाविस्कर उर्फ बदू हे दोन्ही आले. तसेच स्वप्निल यास उद्देशून जुने भांडण घेवून असे सांगत आमच्यासोबत चल असे म्हणाले. यावेळी स्वप्निल याने नकार दिला असता, भूषण व पवन या दोघांनी स्वप्निलला चॉपर दाखवून मारण्याची धमकी दिली.
चॉपर पहाताच दोघे आपल्या जीवे मारतील या भितीने स्वप्निल गल्लीबोळातून पळत सुटला. यावेळी भूषण व पवन या दोघांसह आणखी दोघांनी स्वप्निलला अडविले. तसेच आम्ही या एरीयाचे दादा असून तु आमच्या नांदी लागू नको, तुला महागात पडेल, अशी धमकी दिली. यावेळी भूषण माळी याने फरशी स्वप्निलच्या डोक्यात टाकली. तर इतरांनी त्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेत जखमी स्वप्निल ठाकूर याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्वप्निलचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून त्यावरुन भूषण विजय माळी उर्फ भासा, पवन बाविस्कर उर्फ बदू , आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मराठे वय 21 व पियुष उर्फ मुकूंदा ठाकूर सर्व रा. तुकाराम वाडी या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांबाबत पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी गोविंदा पाटील , इम्रान सय्यद यांच्या पथकाने अटक केली. आज 1 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती व्ही.सी.जोशी यांनी 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे आर. पी. गावित यांनी कामकाज पाहिले.